Sunday, 2 August 2020

व्यवसायातील अर्थगणित

१. तुमच्या व्यवसायातुन तुमचा स्वतःचा पगार वजा करता नफ्याच्या रुपात काही शिल्लक रहात असेल तर तुम्ही व्यवसाय करत आहात, जर पगार वजा जाता काहीच शिल्लक रहात नसेल तर तुम्ही स्वयंरोजगारात आहात... जर सगळ्यांची देणी देऊन तुम्हाला तुमचा पगार सुद्धा निघत नसले तर तुम्ही स्वयंरोजगारातही नसून, फक्त मजुरी करत आहात असा अर्थ निघतो...

 

२. जर पगार वजा जाता काही शिल्लक रहात असेल पण तो नफा व्यवसायातील गुंतवणुकीवर १२% प्रतिवर्ष व्याज पकडुन तीन वर्षात गुंतवणुक वसुल करण्यासाठी कमी पडत असेल तर तुमचा व्यवसाय टेक्नीकली तोट्यात चालला आहे असे समजावे. सोप्या आकडेवारीत सांगायचं म्हटलं तर महीन्याला गुंतवणुकीच्या 3.80-४% उत्पन्न निव्वळ नफा म्हणुन हाती‌ आले‌ पाहीजे.

 

३. जर तुमचा‌ व्यवसाय ३ वर्षांपेक्षा जुना असेल, गुंतवणुक वसुल झालेली असेल, किंवा पारंपारीक‌ व्यवसाय असेल, तर अशावेळी तो सेटअप उभा करण्यासाठी‌ आज किती खर्च‌ येऊ शकतो याचा अंदाज‌ घेऊन त्यानुसार महीन्याला किमान किती उत्पन्न मिळाले पाहीजे याचा‌ हिशेब करु शकता. अशा प्रकारात त्या अंदाजे गुंतवणुकीच्या किमान २% निव्वळ उत्पन्न महिन्याला हाती आले पाहिजे. जर व्यवसायाची उलाढाल प्रत्येक महिन्याला होणे शक्य नसेल, म्हणजे पेमेंट २-३ महिन्याला मिळत असतील किंवा वर्षातून काही महिने जास्त आणि काही महिने कमी उलाढालीचे असतील तर ३-६-९ महिन्यांच्या किंवा अगदी वर्षभराच्या उलाढालीच्या व उत्पन्नाच्या हिशोबाची सरासरी काढावी.

 

४. महीन्याला किती‌ उत्पन्न मिळेल याचा विचार करुन व्यवसाय सुरु करायचा नसतो, मार्केटमधे कशाची‌ गरज आहे, आपल्याा काय ‌जमू शकतं, आपल्या अवाक्यात काय आहे हे पाहूनच व्यवसाय सुरु करायचा असतो. व्यवसायात‌ कोणत्याही‌ फिक्स‌ उत्पन्नाची अपेक्षा ठेऊ नये, दोन सारखाच व्यवसाय करणाऱ्या आणि सारखेच सेटअप असणाऱ्या व्यावसायिकांचे उत्पन्न वेगवेगळेच असते. पण तुम्ही जी गुंतवणुक‌‌ करत आहात तीच्या‌ प्रमाणात‌ किमान उत्पन्न आले पाहिजे असा‌ तुमचा प्रयत्न असायलाच हवा.


व्यवसायातून उत्पन्न मिळतंच असतं. व्यवसाय विनाउत्पन्नाचा नसतो. त्यामुळे जी गोष्ट व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे तिचे प्रमाण जाणून घेण्याची गरज नसते. उत्पन्नाचे प्रमाण हे नेहमीच उलाढालीवर आणि ग्राहकांवर ठरत असते..

 

गुंतवणुकीच्या प्रमाणात किमान किती उत्पन्न मिळायला हवे आणि महीन्याला किती मिळतील हा प्रश्न या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. पहिला प्रश्न टेकनीकल आणि आकडेवारीवर अधारीत आहे तर दुसरा प्रश्न व्यवसायात यायचंय पण नोकरीप्रमाणे फिक्स उत्पन्न पाहिजे असा मानसिकतेचा आहे.

 

(यासंबंधी 'व्यवसायातील अर्थशास्त्र' या नावाने काही महिन्यांपूर्वी काही स्लाईड्स पब्लिश केलेल्या आहेत, त्यातही बरीच सविस्तर माहिती दिलेली आहे.)

 

व्यवसाय साक्षर व्हा...

 
 
Copyright © 2017 hackkode.com
The content is copyrighted to hackkode.com and may not be reproduced on other websites.

Powered by Allsymptoms.org